अरे बापरे…पत्नीचा शिरच्छेद करून कुलदेवतेला दिला बळी !

सिंगरौली वृत्तसंस्था । आजच्या अत्याधुनीक युगातही काही लोक आदिम युगात जगत असल्याचे दिसून येत असून अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली आहे. यात एका नराधमाने आपल्या पत्नीचा शिरच्छेद करून कुलदेवतेला बळी दिल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात अंधश्रद्धेतून पतीने पत्नीचा शिरच्छेद करून आपल्या कुलदेवीला अर्पण केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगरौली जिल्ह्यातील बैधान पोलिस स्टेशन परिसरातील बसोडा गावात बुधवारी रात्री १२.३० च्या सुमारास ब्रजेश केवट (वय ४२) यांनी पत्नी बिट्टी केवट (३९) हिचा खून केल्याची घटना घडली. माहिती मिळताच एसपीसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी अद्याप फरार आहे.

हत्येच्या आदल्या दिवशी ही महिला आपल्या मुलांसमवेत सासन पोलिस स्टेशनमध्ये गेली होती. तिने तिचा पती ही खून करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांनी याला हसण्यावारी नेत तिला घरी पाठवून दिले. मात्र दुसर्‍याच दिवशी तिचा खून झाल्याने आता पोलीस प्रशासन खळबळून जागी झाले आहे.

मृताचा मुलगा सुरेश (११) यांनी पोलिसांना सांगितले की घटनेच्या रात्री त्याच्या आईवडिलांमध्ये वाद झाला. त्याच्या वडिलांनी आपल्या आईची हत्या केल्याचे चौकशीत समोर आले आहे. घटनास्थळी त्या महिलेचे डोके कापून मातीच्या खाली गाडण्यात आले होते. तर धडाभोवती पूजेचे साहित्य विखुरलेले होते. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या ब्रजेशने कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी स्वत: च्या पत्नीचा गळा कापल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

दरम्यान, आपल्या पत्नीचा शिरच्छेद करण्यापूर्वी त्या नराधमाने आदल्या रात्री बकर्‍याचा बळी देवीला अर्पण केला होता. तेव्हात त्या महिलेस आगामी भयसूचक घटनेची शंका आली. मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेस प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत सिंगरौली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक वीरेंद्र कुमार सिंह यांनी अंधश्रध्देतून हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती दिली आहे. जनतेने अंधश्रध्देला थारा न देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Protected Content