लय भारी : श्रीवल्लीच्या मराठी व्हर्जनची धूम – बघा सोशल मीडिया स्टार खंडारे दाम्पत्याची धमाल !

अमरावती प्रतिनिधी | आपल्या वर्‍हाडी भाषेतील अफलातून कॉमेडी व्हिडीओजमुळे सोशल मीडियातील सुपरस्टार म्हणून ख्यात झालेले विजय खंडारे आणि त्यांची पत्नी तृप्ती यांच्या श्रीवल्ली या गाण्याच्या मराठी व्हर्जनची धूम सध्या समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. अवघ्या काही दिवसातच तुफान लोकप्रिय झालेल्या या मराठी व्हर्जनच्याच आता अनेक कार्बन कॉप्या निघाल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील निंबोरा गावातील रहिवासी असणारे विजय खंडारे आणि त्यांची पत्नी तृप्ती खंडारे हे दाम्पत्य सध्या सोशल मीडियाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे. आधी टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून त्यांनी प्रसिध्दी संपादन केली. टिकटॉक बंद झाल्यानंतर त्यांनी युट्युब व्हिडीओजवर आपले लक्ष केंद्रीत केले असून अलीकडेच त्यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातूनही आपल्या चाहत्यांशी संवाद सुरू केला आहे.

विजय आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य अतिशय सर्वसाधारण स्थितीतले असून ते साध्या घरात राहतात. स्मार्टफोनच्याच मदतीने त्यांनी आपला भोवताल आणि दैनंदिन जीवनातील घटना या अतिशय खुमासदार पध्दतीत सादर करण्यास प्रारंभ केला असून याला रसिकांची उदंड प्रतिसाद लाभला आहे. विजय खंडारे यांच्या अधिकृत अकाऊंटसह त्यांनी अनेक अकाऊंट आहेत. ते काही व्हॉग्जच्या माध्यमातून नवनवीन ठिकाणांची ओळख देखील करून देत असून यालाही लोकप्रियता मिळाली आहे. तर आता त्यांनी गायनाच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे.

सध्या प्रचंड गाजत असलेल्या पुष्पा या दाक्षिणात्य चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याची मराठी आवृत्ती विजय खंडारे यांनी तयार केली आहे. हे गाणे त्यांनी स्वत: गायले असून यात त्यांच्यासह त्यांची पत्नी तृप्ती खंडारे, मित्र मनीष आणि इतरांनी भूमिका साकारल्या आहेत. तर या गाण्याचे त्यांनी स्वत:च्या मोबाईलवर चित्रीकरण केले आहे. गाण्याच्या शुटींगची जबाबदारी ही विजय खंडारे यांनी बहिण आचल यांनी समर्थपणे पार पाडली आहे.

मराठीतल्या श्रीवल्ली या गाण्याचे बोल साधे-सरळ पण थेट हृदयाला भिडणारे असून विजय खंडारे यांनी त्याला अतिशय समरसून गायले आहे. तर याचे चित्रीकरण आणि एडिटींग देखील लाजवाब आहे. हे चित्रीकरण ग्रामीण भागातच केले असून यात विनोदाचा प्रसन्न शिडकाव करण्यात आला असून याच्या शेवटी प्रेम यशस्वी झाल्याचे दाखविण्यात येत आहे.

श्रीवल्ली गाण्याची मराठी आवृत्ती २९ डिसेंबर रोजी अपलोड करण्यात आली असून दिवसाला एक लाखांपेक्षा जास्त युजर्स याला पाहत असून आतापर्यंत १७ लाखांपेक्षा जास्त जणांनी याला पाहिले आहे. यात खंडारे दाम्पत्याचा सहज-सुलभ अभिनय हा सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ आपण खाली पाहू शकतात.

खालील व्हिडीओत आपण श्रीवल्ली गाण्याबाबत खंडारे यांचा वार्तालाप पाहू शकतात.

Protected Content