Home राजकीय ठाकरे गटाचे दोन खासदार परतण्याची शक्यता ? 18 जूनच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष

ठाकरे गटाचे दोन खासदार परतण्याची शक्यता ? 18 जूनच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष

0
12

मुंबई-वृत्तसेवा। शिवसेनेतील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याची चर्चा सुरू असतानाच आता त्यापैकी दोन खासदार पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाने आपल्या संसदीय पक्षातील खासदारांसाठी व्हीप जारी केला असून, १८ जून रोजी संसदीय पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सर्व खासदारांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. या बैठकीला कोण-कोणते खासदार उपस्थित राहतात, यावरून पक्षातील नेमकी स्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदारांनी बंडखोरी केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचेही बोलले जात असून, हा गट लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सावध पावले उचलली जात आहेत. पक्षाने व्हीप जारी करून सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत किती खासदार सहभागी होतात आणि कोण अनुपस्थित राहतात, यावरून बंडखोरीची वास्तविक स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे गटासाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बंड केलेल्या सहा खासदारांपैकी दोन खासदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात परतण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत अनिल देसाई, विनायक राऊत आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदार असल्याचे सांगितले जाते. तर सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यापैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे १८ जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे नेते या दोन्ही खासदारांच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना सादर करण्यात येणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसून, आगामी बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. १८ जून रोजी होणाऱ्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर शिवसेनेतील खासदारांच्या राजकीय भूमिकेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन खासदार पुन्हा ठाकरे गटात परतल्यास शिंदे गटाच्या हालचालींना मोठा धक्का बसू शकतो.


Protected Content

Play sound