स्मशानभूमीत गांजा ओढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। जळगाव शहरातील आर वाय पार्कजवळ असलेल्या स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत चिलिममध्ये गांजा ओढणाऱ्या एका तरुणावर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी सोमवार, १२ मे रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आर.वाय. पार्क परिसरातील स्मशानभूमीत काही तरूणी गांजाचा नशा करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता आर.वाय. पार्क परिसरात छापा टाकला. या ठिकाणी मनोज शांताराम तायडे (वय ३०, रा.कांचन नगर, जळगाव) हा चिलिममध्ये गांजा ओढताना मिळून आला. पोलीस कॉन्स्टेबल वसीम मलिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी मनोज तायडे याच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करत आहेत. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी नशेखोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.