पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर-पहूर रोडवर हॉटेल रोहिणीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने लग्नातील वऱ्हाडींच्या क्रुझरला जोरदार धडक दिल्याने एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, १० मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणी पहूर पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत व्यक्ती दशरथ रतन चव्हाण (वय-६०, रा. फर्दापूर तांडा, ता.सोयगाव) असे आहेत. ते जामनेर तालुक्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी आपल्या गावकऱ्यांसोबत क्रुझर (एमएच ०८ आर ३५२४) मधून गेले होते. लग्न आटोपून परत येत असताना, समोरून वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या क्रुझरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत क्रुझर पलटी झाली आणि दशरथ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात क्रुझरमधील इतर नऊ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेनंतर, मृत दशरथ चव्हाण यांचे पुत्र अंबादास चव्हाण यांनी सोमवार, १२ मे रोजी दुपारी ३ वाजता पहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी डंपर चालक गुरुजीतसिंह जुबेरसिंह (वय ४५, रा.गोविंद नगर, कानपूर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुभाष पाटील करत आहेत. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.