जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट् विद्यापीठाच्या ४ हजार ४८० विषयांच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने दिल्या. सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने सुरळितपणे व यशस्वीरित्या पार पडल्या असून त्यांचे निकाल ही जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी सांगितले आहे.
विविध विद्याशाखा व अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षा ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर,२०२० च्या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या नियमित व प्रथम वर्षाच्या बॅकलॉग विषयांच्या परीक्षा आणि दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासोबत प्रथम वर्षाच्या बॅकलॉगसह परीक्षा ५ जानेवारी,२०२१ ते १७ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. आणि २ मार्च २०२१ ते १७ मार्च, २०२१ या कालावधीत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या सत्र-१ च्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.
या अभ्यासक्रमाच्या प्रात्याक्षिक परीक्षा देखील दि.३१ मार्च २०२१ पावेतो ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकालही तात्काळ जाहीर करण्यात आलेले आहेत. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली आहे.