बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहुरपेठ परिसरातील नवकार बंगला येथे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने, देवळातील मुर्त्या असा एकूण ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनेश अनिल जैन (वय-३५) रा. नवकार बंगला, पहूर, ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते १७ ऑगस्ट सकाळी ९ वाजता दरम्यान त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच देवळातील मुर्त्या असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरमालक दिनेश जैन यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर सायंकाळी ५ वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

Protected Content