अवैधरित्या वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले; चालक फरार

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा गावातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलिसांनी पकडले आहे. यावेळी ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला.  याप्रकरणी गुरुवार २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा गावाच्या नजीक असलेल्या पाण्याच्या टाकीच्या जवळून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गुरुवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ बीजी ८८१४) वर कारवाई केली. दरम्यान पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर जागेवरच सोडून पसार झाला. दरम्यान पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल तुषार जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक आणि मालक या दोघांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश ठाकूर करीत आहे.

Protected Content