Home क्राईम अरे बापरे : बैलांच्या धडकेच्या वादातून तरूणाचा भोसकून खून !

अरे बापरे : बैलांच्या धडकेच्या वादातून तरूणाचा भोसकून खून !

0
4


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकरी बांधवांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या बैलपोळ्याच्या दिवशीच एक अत्यंत दुर्दैवी आणि संपूर्ण तालुका हादरवून सोडणारी घटना पारोळा तालुक्यातील गजानन पळासखेडे बु. येथे घडली आहे.

आज पोळ्याच्या दिवशी दुपारी बैलांच्या धडकेवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले. यात मयूर बाळू ऊर्फ दुर्वास पाटील या अवघ्या १८ वर्षीय कोवळ्या तरुणाच्या पोटात चाकू भोसकून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. उपचारासाठी जळगावला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून संशयित आरोपी फरार झाला आहे.

पळासखेडे बु. येथे गुरुवारी बैलपोळ्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने पोळा फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त गावातील शेतकरी आपापल्या बैलांना सजवून राजवड रस्त्यावरील पानदेव महाराज मंदिरात दर्शन व पूजेसाठी घेऊन जात होते. दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास बाळू ऊर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५) आणि त्यांचा १८ वर्षांचा मुलगा मयूर हे दोघे बैलपूजा आटोपून गावाकडे परतत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या अंकुश नेहरू पाटील याच्या बैलाची आणि मयूरच्या बैलाची एकमेकांना धडक बसली. बैलांना धक्का लागल्याच्या या क्षुल्लक कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

रागाच्या भरात संशयित आरोपी अंकुश पाटील याने मयूरसोबत वाद घालत अचानक त्याच्या पोटात धारदार चाकूने वार केले. या अनपेक्षित जीवघेण्या हल्ल्यामुळे मयूर जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेतील मयूरला ग्रामस्थांनी तातडीने दुचाकीवरून पारोळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, चाकूचे वार वर्मी लागल्याने व मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णवाहिकेतून जळगावला नेत असताना, वाटेत एरंडोल शहराजवळ मयूरची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

ऐन सणाच्या दिवशी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पवित्र दिवशीच एका कोवळ्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. एका किरकोळ कारणावरून गेलेल्या या बळीमुळे पळासखेडे परिसरात प्रचंड हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound