Home क्राईम अडावद पोलिसांची कामगिरी ; २६ हजार रुपयांची १७५ गांजाची झाडे जप्त ;...

अडावद पोलिसांची कामगिरी ; २६ हजार रुपयांची १७५ गांजाची झाडे जप्त ; मध्य प्रदेशातील संशयिताला बेड्या

0
1


अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुड्याच्या घनदाट जंगलाचा फायदा घेत वनविभागाच्या क्षेत्रात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजा शेतीचा अडावद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगड शिवारात वनविभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक १६९ मध्ये धाड टाकून पोलिसांनी तब्बल २६ हजार २०० रुपये किमतीची १७५ लहान-मोठी गांजाची झाडे जप्त केली आहेत. ‘ड्रग्स फ्री जळगाव’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे सातपुड्याच्या पायथ्याशी अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक, खरेदी-विक्री, सेवन आणि अवैध लागवड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘नशामुक्त भारत’ व ‘ड्रग्स फ्री जळगाव’ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला आणि गुप्तचर यंत्रणेला सतर्क राहून अमली पदार्थांशी संबंधित ठोस माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सपोनि प्रशांत कंडारे यांना त्यांच्या अत्यंत विश्वासू बातमीदाराकडून देवगड शिवारातील वनविभागाच्या हद्दीत अमली पदार्थाची अवैध शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री पटल्यानंतर लागलीच सपोनि कंडारे यांनी आपल्या पथकासह देवगड शिवारातील वनविभागाच्या कंपार्टमेंट क्र. १६९ मध्ये छापा टाकला. तेथे सोयाबीन आणि तुरीच्या पिकाच्या आड मानवी शरीरास अत्यंत घातक आणि अपायकारक ठरणाऱ्या ओल्या हिरव्या गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याचे पंचांसमक्ष उघडकीस आले.

पोलिसांनी घटनास्थळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पंचांसमक्ष जप्ती पंचनामा केला. या कारवाईत एकूण १ किलो ३१० ग्रॅम वजनाची आणि २६ हजार २०० रुपये मूल्याची १७५ ओली हिरवी गांजाची लहान-मोठी झाडे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मूळचा मध्य प्रदेशातील सोनखेडी (ता. वरला, जि. बडवाणी) येथील रहिवासी व सध्या देवगड शिवारातील अनेर नदीकाठच्या झोपडीत राहणारा संशयित आरोपी देवसिंह रावल्या बारेला (वय ४४) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अडावद पोलिसांत NDPS Act १९८५ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि प्रशांत कंडारे करत आहेत. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि प्रशांत कंडारे, ग्रेड पोउपनि जितेंद्र सोनवणे, सफो नासिर तडवी, पोहेकॉ विनोद धनगर, संजय धनगर, शेषराव तोरे, भारत नाईक, किरण शिरसाठ, पोकॉ भूषण चव्हाण आणि मपोकॉ दिव्या मराठे यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound