Home क्राईम विटनेरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा धुमाकूळ ; गोठ्यात घुसून गाईच्या बछड्याची शिकार

विटनेरमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा धुमाकूळ ; गोठ्यात घुसून गाईच्या बछड्याची शिकार

0
11


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील विटनेर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वाढलेला वावर आता शेतकरी आणि ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. बुधवारी दिवसाढवळ्या बिबट्याने गोठ्यात घुसून गाईच्या बछड्याची शिकार केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

विटनेर परिसरात बिबट्याचा वावर गेल्या सुमारे सहा महिन्यांपासून असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बुधवारी माजी उपसभापती सुभाष लोटन कोळी यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून तेथील गाईच्या बछड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बछडा ठार झाला असून, बिबट्याने त्याचा फडशा पाडल्याचे समोर आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

बिबट्याच्या सातत्याने होणाऱ्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यासाठी जाणे, जनावरांना चराईसाठी बाहेर सोडणे तसेच सायंकाळच्या वेळी शेत परिसरातून ये-जा करणे याबाबत शेतकरी धास्तावले आहेत. बिबट्या मानवी वस्तीजवळ तसेच गोठ्यांच्या परिसरातही फिरत असल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव जनावरांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत कळविले आहे. परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, त्याचा वावर असलेले ठिकाण निश्चित करावे आणि आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशीही मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा बछडा गमावलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. वनविभाग आणि महसूल प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचक्रोशीतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने केवळ घटना घडल्यानंतर कारवाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाही गती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. बिबट्याला वेळीच जेरबंद न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound