


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील आगामी SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक भालोद, ता. यावल येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील SIR प्रक्रियेच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या, मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेल्या नियोजनाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. किरीट सोमय्या यांनी रावेर विधानसभा क्षेत्रासह जळगाव पूर्व जिल्ह्यात SIR कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी काळातही प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन आणि कार्यपद्धतीबाबत त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी बूथस्तरावर कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. मतदारांशी संपर्क साधून आवश्यक माहितीची पडताळणी करणे आणि प्रक्रियेशी संबंधित कामकाजात सक्रिय सहभाग घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस आमदार अमोल जावळे, विधानपरिषदेचे आमदार नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन, भाजप जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अण्णा बाविस्कर, केतकी पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, कृउबा समितीचे माजी सभापती हर्षल पाटील, भाजप किसान मोर्चाचे पूर्व क्षेत्र जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील, रावेर विधानसभा क्षेत्र BLA-1 विलास चौधरी यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



