


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांच्या निधनाला अवघे चार दिवस झाले असतानाच कार्यालयातील कर्मचारी हैदर हबीब तडवी (वय ५२) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एकाच आठवड्यात शासकीय सेवेतील दोन जणांचा अचानक मृत्यू झाल्याने कृषी कार्यालयासह यावल तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदर हबीब तडवी हे यावल तालुका कृषी कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते मूळचे कळमोदा, ता. रावेर येथील रहिवासी असून सध्या यावल शहरातील तडवी कॉलनी येथे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी त्यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यालयीन सेवा बजावली. त्यानंतर कार्यालय बंद करून ते तडवी कॉलनीतील आपल्या घरी परतले. सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या दरम्यान हैदर तडवी यांना अचानक त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी तपासणी केली.
हैदर हबीब तडवी यांच्या अचानक निधनाची वार्ता समजताच तडवी कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच कृषी विभागातील सहकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत हैदर तडवी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे दुःख ओढवले आहे.
विशेष म्हणजे, यावल तालुका कृषी कार्यालयात अवघ्या एका आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर आता त्याच कार्यालयातील कर्मचारी हैदर तडवी यांच्या निधनाने कृषी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.



