Home Cities जळगाव पोळ्याच्या जल्लोषात नशिराबादची अडीचशे वर्षांची बैलशर्यत रंगली ; उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत किशोर...

पोळ्याच्या जल्लोषात नशिराबादची अडीचशे वर्षांची बैलशर्यत रंगली ; उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत किशोर पाटील प्रथम

0
4


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबादकरांसाठी पोळा हा केवळ सण नसून शेतकरी संस्कृती, बैलांप्रती कृतज्ञता आणि गावच्या पारंपरिक उत्साहाचा अनोखा सोहळा आहे. यंदाही पोळ्यानिमित्त आठवडे बाजाराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक बैलशर्यतीसह नगरपरिषदेतर्फे घेण्यात आलेल्या उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेमुळे पोळ्याच्या उत्सवाला विशेष रंगत आली.

नगरपरिषदेतर्फे आयोजित उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धेत किशोर मधुकर पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. ज्ञानदेव कौतिक पाचपांडे यांच्या बैलजोडीने द्वितीय, तर सतीश पंडित कावळे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार १००, ५ हजार १०० आणि ३ हजार १०० रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, नशिराबादच्या पोळ्याला लाभलेली सुमारे अडीचशे वर्षांची पारंपरिक बैलशर्यत यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. शर्यतीमध्ये दीपक बोंडे आणि बाळकृष्ण नारखेडे यांच्या बैलांनी बाजी मारत उपस्थितांची दाद मिळवली. या दोन्ही विजेत्यांचा नगरपरिषदेतर्फे पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

पोळ्याच्या दिवशी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या बैलजोड्या, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि बैलशर्यतीचा थरार यामुळे आठवडे बाजाराचे प्रांगण उत्साहाने फुलून गेले होते. या सोहळ्यातून शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते तसेच नशिराबादची जुनी कृषीपरंपरा जपली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमास नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, पाणीपुरवठा सभापती कीर्तिकांत चौबे, नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह पोळा उत्सव समितीचे पदाधिकारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound