Home क्राईम गावठी कट्टे घेऊन निघाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; चोपड्यात तिघांना अटक

गावठी कट्टे घेऊन निघाले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; चोपड्यात तिघांना अटक

0
13

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्रांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्या अंगझडतीतून ३ गावठी बनावटीचे कट्टे आणि ८ जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैधरीत्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय सोनावणे यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहिती संकलित करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, १ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनावणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत काही व्यक्ती गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने विशेष पथक तयार केले. त्यानंतर लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी करण्यात आली.

नाकाबंदी दरम्यान हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक (MH-18 CA-2228) वरून येणाऱ्या तिघांना पोलिसांनी थांबवले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ३ गावठी बनावटीचे कट्टे आणि ८ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये साहील दगडू आवारे (१९), रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे; सौरभ संतूराम मोतोरावे (२३), रा. पिंपरी चिंचवड, चिखली गावठाण; तसेच रोहित चंद्रकांत जुनगर (३०), रा. पार्वती कॉम्प्लेक्स, मेहतर वस्ती, मारेवस्ती, चिखली, पुणे यांचा समावेश आहे.

या कारवाईत ३ स्टीलचे गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, मोटोरोला कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल, रियलमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोकॉ दीपक शिंदे, विशाल पाटील, प्रकाश मथुरे, गजानन पाटील, शुभम पाटील आणि प्रमोद पवार यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound