Home Cities जळगाव रस्ते अपघातात तरुणाच्या मेंदूला गंभीर दुखापत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तातडीच्या शस्त्रक्रियेतून...

रस्ते अपघातात तरुणाच्या मेंदूला गंभीर दुखापत; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तातडीच्या शस्त्रक्रियेतून प्राण वाचले

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध झालेल्या २४ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाच्या मेंदूवरील दाब कमी करण्यासह साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले. वेळेत उपचार आणि तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, खरगाव येथील लंगडा अंबा परिसरातील रहिवासी दयाराम बरेला (२४) यांचा रस्ते अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी दयाराम हे बेशुद्ध अवस्थेत होते.

रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी तातडीने रुग्णाची तपासणी करून उपचार सुरू केले. त्यानंतर एनसीसीटी ब्रेन तपासणी करण्यात आली. या तपासणीत डोक्याच्या डाव्या कपाळाच्या भागात डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले. म्हणजेच कवटीचे हाड तुटून आतल्या बाजूला दाबले गेले होते. तसेच फ्रॅक्चरच्या खालील भागात मेंदूच्या ऊतींना दुखापत झाल्याचे म्हणजेच ब्रेन कंट्युजन असल्याचे निदान झाले.

रुग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्याने आणि मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी विलंब न करता त्याच दिवशी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यासाठी तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्यासाठी डीकम्प्रेसिव्ह क्रेनिएक्टॉमी विथ इव्हॅक्युएशन ऑफ हेमॅटोमा ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यात आला आणि साचलेले रक्त म्हणजेच हेमॅटोमा बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेतील रुग्णावर वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याने पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली असून पोस्ट-ऑपरेटिव्ह काळात कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

सुरुवातीला बेशुद्ध अवस्थेत असलेल्या दयाराम यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. प्रितम दास आणि त्यांच्या टीमने सहकार्य केले. विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली.

डॉ. प्रितम दास यांनी सांगितले की, रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळणे महत्त्वाचे असते. बेशुद्धावस्था, डोक्याला गंभीर मार, उलट्या, झटके किंवा रुग्ण प्रतिसाद देत नसल्यास विलंब न करता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. दयाराम बरेला यांच्या प्रकरणात वेळेत रुग्णालयात दाखल करून आवश्यक तपासण्या आणि तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound