नालासोपारा येथे १९ हजारांहून अधिक बोगस मतदार ?

election

मुंबई प्रतिनिधी । नालासोपारा विधानसभा निवडणूकांच्या मतदार यादीतील १९ हजारांहून अधिक बोगस मतदारांची नावे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वसई आणि बोईसर मतदारसंघाच्या तुलनेत नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक बोगस मतदारांची नोंद झाली असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त मतदार नालासोपारा मतदारसंघात आहेत. पाच लाखांहून अधिक मतदार येथे असून त्यातील एक लाखाच्या आसपास मतदारांची नावे बोगस असल्याचा आरोप करत ‘बविआ’ने याबाबत पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. याबाबतच्या चौकशीत बोगस मतदार आढळून आले नाहीत, मात्र नोंदणी करताना सारखी असणारी काही नावे आढळून आली असून ती सहा हजारांच्या आसपास असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनानंतर नालासोपारा मतदारसंघात मतदारांची संख्या कशी वाढली, याची शोधमोहीम बहुजन विकास आघाडीने सुरू केली. त्यासाठी गेले काही दिवस मतदारसंघातील याद्यांची अन्य मतदारसंघातील याद्यांशी पडताळणी करण्यात येत होती. यामध्ये त्यांना तब्ब्ल १९ हजारांहून अधिक मतदार बोगस असल्याचे पुरावे आढळून आल्याची माहिती, आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मतदारांची पूर्ण नावे, त्यांचे वय व लिंग एकसारखे असल्याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच, ५०० मतदार ओळखपत्र क्रमांकांच्या छाननीमध्ये एकाच व्यक्तीकडे दोन वेगवेगळ्या मतदारसंघातील मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळून आल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. तसेच, ही यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली असून याबाबत तक्रार नोंदविल्याचे त्यांनी म्हटले.

Protected Content