१५ जूनपर्यंत केंद्र पुरवणार ७ कोटी ८६ लाख लसी

 

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकार राज्यांना आता  १५ जूनपर्यंत ७ कोटी ८६ लाख लसी मोफत पुरवणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसी वाटपाची माहिती राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिली आहे. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही  लसी दिल्या जाणार आहेत

 

या  आगाऊ माहितीमुळे राज्य सरकारांना योग्य पद्धतीने नियोजन करता येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. मात्र कोरोना लशींचा तुटवडा असल्याने या मोहिमेला धक्का बसला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

 

केंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात ५० टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. या लशी राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे. १ मे ते १५ जूनपर्यंत पुरवण्यात येणारे ५ कोटी ८६ लाख २९ हजार लशींचे डोस राज्यांना मोफत देणार आहे. या व्यतिरिक्त जून अखेर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून थेट खरेदीसाठी एकूण ४ कोटी ८७ लाख ५५ हजार लशी उपलब्ध असतील अशी माहिती लस उत्पादकांकडून देण्यात आली आहे.

 

देशात मागील २४ तासांत २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  याच कालावधीत देशात ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. असं असलं तरी वाढत्या मृत्यूमुळे देशाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा २ लाख ८३ हजार २४८ वर जाऊन पोहोचला आहे.

 

 

Protected Content