शिवसेनेचे १०० आमदार निवडून येणार : विनायक राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज किती जण जरी बंड करून बाहेर गेले तरी आगामी निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून येतील असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. याप्रसंगी त्यांनी बंडखोर आणि त्यातही विशेष करून उदय सामंत व दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

शिवसेनेत बंडाळी होऊन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विनायक राऊत हे आज चिपळूण येथील दौर्‍यावर आहेत. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतां ते म्हणाले की, आताची शिवसेना ही १९६६ कालावधीतील शिवसेना आहे. हे गृहित धरुन आम्ही पुन्हा शिवसेनेची उभारणी करणार आहोत. मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनता शिवसेनेचे शंभर आमदार निवडून देतील ही आम्हाला खात्री आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. ज्यांनी सेनेतून बंडखोरी केली त्यांचा हिशोब जनताच करेल असे ते म्हणाले.

याप्रसंगी त्यांनी बंडखोरांवर टीका केली. सामंत आणि केसरकर यांच्यासारखी मंडळी ही आयत्या बिळावर नागोबा सारखी आहे. रत्नागिरी मध्ये उदय सामंत यांनी शिवसेना वाढविली नाही तर शिवसेनेने उदय सामंत यांना वाढविले. बंडखोरी नंतरही शिवसेना पक्ष मजबूतीने उभा आहे. आमदार पक्ष सोडून गेले. मतदार आणि कार्यकर्ते पक्षाबरोबर आहेत. जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारात विकले गेले त्याची आम्हाला अजिबात चिंता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content