संतापजनक : गतीमंद महिलेला दोन महिने साखळदंडाने बांधले !


कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोल्हापूर शहरातील यादव नगरात एका गतीमंद व अपंग महिलेला तब्बल दोन महिने साखळदंडाने बांधून ठेवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सारिका हनुमंत साळी (वय-४०) असे या पीडित महिलेचे नाव आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली.

राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या यादव नगर परिसरात सारिका साळी आपल्या भाचा, भाऊ आणि भावाची पत्नी यांच्यासोबत राहत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, सारिका या मतिमंद आणि अपंग आहेत. त्या परिसरातील नागरिकांना त्रास देत असल्याचा युक्तिवाद करत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तीन कुलुपे लावून साखळदंडाने बांधून ठेवले होते.

या प्रकरणाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी पाहिले असता, सारिका साळी यांना अक्षरशः अंगभर साखळदंड बांधण्यात आले होते आणि त्यांना तीन कुलुपेही लावण्यात आली होती. ही भयानक परिस्थिती पाहून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी महिलेचा भाचा अनिरुद्ध याच्या कानशिलात लगावली.

यानंतर पोलिसांनी कुलुपाच्या चाव्या मागितल्या असता, तीनपैकी फक्त दोन चाव्या मिळाल्या. एका कुलुपाची चावी नसल्यामुळे अखेर चावी करणाऱ्या कारागिराला बोलावून नवीन चावी करून कुलूप उघडण्यात आले. त्यानंतर सारिका साळी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही अनिरुद्ध सूर्यकांत साळी याच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी अनिरुद्ध सूर्यकांत साळी याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू केली आहे. परिसरातील नागरिकांनी संबंधित महिला अपंग असून शेजाऱ्यांना त्रास देत असल्यामुळे घरच्यांनी तिला बांधून ठेवल्याचे सांगितले.