


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळ रेल्वे पुलानजीक घडलेल्या रस्ता लुटीच्या गंभीर गुन्ह्याचा रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जलद तपास आणि अचूक तांत्रिक विश्लेषणामुळे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळविले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख जावीद शेख अमान (रा. विनावल, ता. रावेर) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. बांधकामासाठी मजूर शोधत असताना एका व्यक्तीने मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यांना अजंदा गावाजवळील रेल्वे पुलानजीक बोलावले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोख रक्कम लुटली. एवढ्यावरच न थांबता, त्यांच्या मोबाईलद्वारे फोन-पे अॅपचा वापर करून विविध खात्यांमध्ये ऑनलाइन रक्कमही वळती करण्यात आली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. याचदरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशीदरम्यान मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला.
या प्रकरणात शेख मुस्तकीम शेख अकील (२२, रा. फत्तेनगर, रावेर), शेख मोईन शेख नझीम (१९, रा. खिर्डी रोड, विवरा) आणि फैजल बेग हिदायत बेग (१९, रा. शंकर प्लॉट, रावेर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एमएच-१९ ईडी-५५८० क्रमांकाची मोटारसायकल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.



