Home क्राईम ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंचाचा पारा चढला! युवकाला मारहाण; ठाकरेंची युवासेना...

ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंचाचा पारा चढला! युवकाला मारहाण; ठाकरेंची युवासेना मैदानात

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील ग्रामसभेत गावातील धूर मशिन फवारणी बंद असल्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या युवकाला माजी सरपंचाकडून दमदाटी व मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून माजी सरपंचासह तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवासेना युवकाच्या पाठीशी उभी राहिली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

जारगाव येथे प्रशासक संदिप राठोड यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. यावेळी आनंद पाटील या युवकाने गावात डास प्रतिबंधक धूर फवारणी मशिन का फिरविली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मशिन नादुरुस्त असल्यास आपण स्वतः ती दुरुस्त करून देऊ, अशी भूमिका त्यांनी ग्रामसभेत मांडली.

मात्र, हा प्रश्न विचारल्याने माजी सरपंच सुनिल युवराज पाटील संतापल्याचा आरोप आहे. त्यांनी आनंद पाटील यांच्यासोबत वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सुनिल युवराज पाटील, भावेश सुनिल पाटील आणि राहूल पाटील या तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

या घटनेनंतर जारगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये माजी सरपंचाविरोधात नाराजी असल्याचे सोशल मीडियावरील चर्चेतून दिसून येत आहे. ग्रामसभेत गावाच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या युवकाला मारहाण झाल्याने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेने फिर्यादी आनंद पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेतली. यावेळी माजी सरपंच व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन देण्यात आले.

यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवक काँग्रेसचे महानगर अध्यक्ष मुजिब पटेल, युवासेना महानगर युवाधिकारी प्रितम शिंदे, जारगावचे ग्रामस्थ अबिद शेख, चेतन पाटील, शुभम पाटील, वसिम शेख, ऋषीकेश भोई*आदी उपस्थित होते.

“युवकांनी गावाच्या प्रश्नांवर आवाज उठविणे हा त्यांचा अधिकार आहे. युवकांवर अत्याचार करणाऱ्या दोषींविरोधात युवासेना सदैव तत्पर राहील,” अशी भावना आनंद पाटील यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound