Home पर्यावरण मावळमध्ये भीषण भूस्खलन ; विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी घर मातीखाली, कुटुंब अडकल्याची भीती

मावळमध्ये भीषण भूस्खलन ; विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी घर मातीखाली, कुटुंब अडकल्याची भीती

0
12


पुणे-वृत्तसेवा । पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे भीषण भूस्खलनाची घटना घडली. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाठण गावात किल्ल्यावरून मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा कोसळून एक घर पूर्णपणे गाडले गेले. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या घटनेने २०१४ मधील माळीण दुर्घटनेच्या वेदनादायी आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

पाठण गावात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. या सततच्या पावसामुळे विसापूर किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळले. हा मातीचा ढिगारा थेट नंदू तिकोणे यांच्या घरावर येऊन पडल्याने काही क्षणांत संपूर्ण घर जमिनदोस्त झाले. दुर्घटना इतक्या वेगाने घडली की परिसरातील नागरिकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या अक्षय भोसले यांनी सांगितले की, “पहाटे चारच्या सुमारास मी तिकोणे यांचे घर पाहिले होते. अवघ्या पाच मिनिटांनी अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला. आम्ही बाहेर आलो, तेव्हा घराचा मागमूसही नव्हता. संपूर्ण घर मातीखाली गाडले गेले होते.” त्यांच्या या वर्णनामुळे घटनेची भीषणता स्पष्ट होत आहे.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, शेजारी राहणाऱ्या पंकज तिकोणे यांच्या घरात त्या रात्री सुमारे १५ जण उपस्थित होते. अचानक झालेल्या या भूस्खलनामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर गावातील अनेक नागरिकांनी आता या भागात राहण्याची भीती व्यक्त केली असून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच मातीखाली अडकलेल्या कुटुंबीयांचे नातेवाईक घटनास्थळी धावले. त्यांनी सांगितले की, पहाटे साडेचारच्या सुमारास फोनवरून घर मातीखाली गाडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावकरी आणि नातेवाईकांनी मदतकार्य सुरू केले. मात्र, मातीचा ढिगारा अत्यंत मोठा असल्याने बचावकार्य करणे अशक्य होत होते. त्यानंतर एनडीआरएफचे पथक दाखल झाले आणि जेसीबीसह आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पाचव्या बटालियनला तातडीने पाचारण करण्यात आले. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे विशेष पथक सकाळी ५.५० वाजता आवश्यक बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना झाले. बचाव पथकाकडून मातीचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, घटनेबाबत अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी जाहीर करण्यात आलेली नसून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे


Protected Content

Play sound