


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील अर्णव पंकज भावसार याने राज्यस्तरीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जेनियन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आयोजित या स्पर्धेत अर्णवने अवघ्या १३ मिनिटांत १०० पैकी १०० गणिते अचूक सोडवत आपले गणिती कौशल्य सिद्ध केले. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जेनियन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेत स्पर्धकांना १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र अर्णव पंकज भावसार याने दिलेल्या वेळेच्या दोन मिनिटे आधीच, म्हणजे अवघ्या १३ मिनिटांत सर्व १०० गणिते अचूक सोडवत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. त्याच्या वेगवान गणनाक्षमता आणि अचूकतेमुळे परीक्षकांनी त्याच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
या उल्लेखनीय यशानिमित्त रविवार, ५ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात अर्णवचा सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. राज्यभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणे ही त्याच्यासाठी आणि पारोळा शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. अर्णव हा पारोळा येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांचा नातू असून, सावरखेडे (ता. पारोळा) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील उपशिक्षक पंकज सदानंद भावसार यांचा सुपुत्र आहे. शैक्षणिक परंपरा लाभलेल्या कुटुंबातील अर्णवने लहान वयातच आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
या यशामागे धुळे येथील जी चॅम्पस क्लासच्या संचालिका भारती बीडकर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभल्याचे अर्णवच्या पालकांनी सांगितले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आणि अर्णवच्या मेहनतीमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. अर्णवच्या या यशाबद्दल पारोळा व धुळे येथील भावसार समाजासह पारोळा शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देत भविष्यातही अशीच यशस्वी भरारी घ्यावी, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



