‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला अवैध लाभ!


मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या गैरव्यवहारामुळे चर्चेत आली आहे. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असला आणि महायुतीच्या विजयात तिचा मोठा वाटा मानला जात असला तरी, आता यात मोठा घोटाळा उघड झाला आहे. 2 हजार 652 सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जुलै 2024 पासून लागू झालेल्या या योजनेचे काही स्पष्ट नियम आणि निकष आहेत. यानुसार, वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक असलेल्या, चारचाकी गाडी असलेल्या किंवा कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. असे असतानाही, अनेक शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी या नियमांना धाब्यावर बसवून दरमहा दीड हजार रुपये खात्यात जमा करून घेतले. या 2 हजार 652 महिलांनी गेल्या 9 महिन्यांपासून म्हणजे प्रत्येकी 13 हजार 500 रुपये, असे एकूण 3 कोटी 58 लाख रुपये लाटल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचारी महिला वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील आहेत.

हा गैरप्रकार समोर आल्यानंतर सरकार अधिक सतर्क झाले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेला लाभ तपासण्यासाठी आता अजून 6 लाख लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे. यापूर्वी, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एकूण 9 लाख महिलांना विविध कारणांमुळे या योजनेतून अपात्र करण्यात आले होते.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 8 लाख 85 हजार महिलांनी ‘लाडकी बहीण’ आणि ‘नमो शेतकरी’ या दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचेही समोर आले आहे. या दुहेरी लाभाच्या प्रकरणामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

या गंभीर गैरव्यवहारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ही योजना तळागाळातील आणि गोरगरीब महिलांसाठी आणली आहे. यात चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे,” असे ते म्हणाले. या मोठ्या आर्थिक अनियमिततेमुळे सरकारवर कारवाईचा दबाव वाढला असून, दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.