Home क्राईम धुळे-पारोळा महामार्गावर केमिकल टँकरचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

धुळे-पारोळा महामार्गावर केमिकल टँकरचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

0
5


धुळे-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे-पारोळा महामार्गावरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ रविवारी केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. धुळ्याकडून पारोळ्याकडे जात असलेल्या टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने टँकरचा टायर फुटून आग लागली. या दुर्घटनेत टँकरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सुदैवाने टँकरमधील धोकादायक रसायन सुरक्षित राहिल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून ओडिशाकडे निघालेला GJ-18 BV-8315 क्रमांकाचा केमिकल टँकर सबगव्हाण टोलनाक्याजवळ पोहोचला असता, पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडकला. धडकेची तीव्रता इतकी होती की टँकरचा टायर फुटून त्याला आग लागली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुरुवातीला या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर अधिकृतरीत्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातग्रस्त टँकरमध्ये ‘टोल्युइन डायआइसोसायनेट’ (Toluene Diisocyanate – TDI) हे अत्यंत क्रियाशील औद्योगिक रसायन वाहतूक केले जात होते. या रसायनाचा वापर प्रामुख्याने लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज तसेच इलास्टोमर्स तयार करण्यासाठी केला जातो. अपघातानंतर आग लागली असली तरी टँकरमधील केमिकल सुरक्षित राहिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने सांगितले.

धोकादायक रसायनाची वाहतूक सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे धुळे-पारोळा मार्गावर अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेनंतर पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू केला आहे. टँकरने उभ्या कंटेनरला धडक कशी दिली, चालकाला झोप लागली होती की अन्य तांत्रिक कारण होते, याचाही तपास केला जात आहे.


Protected Content

Play sound