पुणे लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मुसक्या अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून आवळल्या आहेत. वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावणे आणि बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा, विशेषतः वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र असल्याचे समोर आले आहे. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच, वैष्णवीचे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला त्याने बंदूक दाखवून धमकावले आणि त्यांच्यावर बंदूक रोखल्याचाही त्याच्यावर गंभीर आरोप आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता आणि त्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट देखील काढण्यात आले होते. सुरुवातीला पोलिसांची तीन पथके त्याचा शोध घेत होती, त्यानंतर पथकांची संख्या वाढवून सहा करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी असलेली वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना गुरुवारी रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. दुसरीकडे, वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे हे पोलीस कोठडीत असून, त्यांच्या पोलीस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. निलेश चव्हाणच्या अटकेमुळे या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.