जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहात विविध पदांची तात्पुरत्या स्वरूपात, रोजंदारी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. यामध्ये वसतिगृह अधीक्षिका (2 स्त्री), पहारेकरी/कम एस्पायस (2 पुरुष), सफाई कर्मचारी (2 स्त्री) आणि स्वयंपाकी (4 स्त्री) या पदांचा समावेश आहे. ही पदे प्रामुख्याने माजी सैनिक संवर्गातून भरली जातील.
माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत माजी सैनिकांच्या पत्नी, वीरपत्नी आणि सामान्य महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 10 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. अर्जासोबत आधारकार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन फोटो आणि पोलिस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे सर्व अधिकार कार्यालयाने राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0257–2241414 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.