Home Cities जळगाव जळगावात उष्णतेवर मात करण्यासाठी ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’

जळगावात उष्णतेवर मात करण्यासाठी ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि पर्यावरणीय असमतोल यावर प्रभावी उपाय म्हणून जळगाव शहरात ४ किलोमीटर लांबीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शहरातील तापमान नियंत्रणास मदत होणार असून नागरिकांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पासाठी विशेष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. कचरा फॅक्टरी ते चंदू अण्णा चौक तसेच निमखेडी गाव ते सुरत रेल्वे गेट या सुमारे ४ किलोमीटरच्या पट्ट्यात ‘ग्रीन कॉरिडोर’ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून शहरात हरित पट्टा निर्माण केला जाणार आहे.

पाहणीदरम्यान पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील, पर्यावरण रक्षक वसंत पाटील तसेच अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पथकाने संपूर्ण परिसराचे तांत्रिक मोजमाप करत मातीची सुपीकता, जलस्रोत आणि वृक्ष लागवडीसाठी आवश्यक घटकांचा सखोल अभ्यास केला.

या सर्वेक्षणावेळी घेतलेल्या तापमान नोंदींनी धक्कादायक वास्तव समोर आणले. उघड्या रस्त्यावरील तापमान तब्बल ५२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर त्याच परिसरातील झाडांच्या सावलीखाली तापमान ३८ अंश सेल्सिअस आढळले. रस्त्यावरील आणि नैसर्गिक छायेखालील तापमानातील तब्बल १४ अंशांचा फरक शहरात हरित पट्ट्यांची किती नितांत आवश्यकता आहे, हे स्पष्ट करणारा ठरला.

ग्रीन कॉरिडोरमध्ये कोणत्या प्रकारची झाडे लावल्यास ती स्थानिक हवामानात वेगाने वाढतील, अधिक सावली देतील आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतील, यावर तज्ज्ञांनी विशेष चर्चा केली. केवळ वृक्षारोपण न करता त्या झाडांचे दीर्घकालीन संवर्धन आणि देखभाल यासाठीही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे.

महापालिकेच्या या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, हा प्रकल्प भविष्यात जळगाव शहरासाठी ‘पर्यावरणीय सुरक्षा कवच’ ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हरित पट्टे निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound