Home आरोग्य आठ वर्षीय बालकाला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी व्हीएसडी शस्त्रक्रिया

आठ वर्षीय बालकाला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी व्हीएसडी शस्त्रक्रिया

0
110


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या आठ वर्षीय बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी एक  वैद्यकीय यश संपादन केले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे बालकाला नवजीवन मिळाले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रावेर तालुक्यातील विदीत या आठ वर्षीय बालकाला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचबरोबर वारंवार कफ आणि सर्दीचा त्रासही जाणवत असल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार केले. मात्र प्रकृतीत समाधानकारक सुधारणा न झाल्याने पुढील तपासणीसाठी त्यांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात संपर्क साधला.

रुग्णालयात बालकाची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बालकाच्या हृदयात जन्मत: छिद्र असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत ‘व्हीएसडी’  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजारामुळे भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

निदान झाल्यानंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या बालकावर मोफत उपचार करण्यात आले. हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धवलकुमार खडके, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. सिद्धेश्वर खांडे, डॉ. झिशान सय्यद आणि डॉ. मनमिता रेड्डी यांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक ही व्हीएसडी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

शस्त्रक्रियेनंतर बालकाची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्याला लवकरच घरी सोडण्यात आले. या यशस्वी उपचारामुळे बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी हृदयालयाचे विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मत: हृदयात छिद्र असण्याची समस्या अनेक बालकांमध्ये आढळते. मात्र योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मुलांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, वजन न वाढणे किंवा वारंवार सर्दी-कफ होणे अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दर आठवड्याला बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी केली जाते. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound