जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसची ड्रोनद्वारे रेकी झाल्याच्या कथित प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांचा शोध घ्यावा तसेच खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री मुक्ताईनगर येथील आमदार एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊस परिसरात ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. सुरक्षारक्षकांनी या ड्रोनचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेची तातडीने चौकशी करून ड्रोनद्वारे निगराणी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. खडसे कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही आणि खडसे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश बारे, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, गणेश पाटील, नईम खाटीक, रफीक पटेल आदी उपस्थित होते.



