Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात पुन्हा दिसले ड्रोन; आ. एकनाथ खडसें यांचा दावा !

मुक्ताईनगरात पुन्हा दिसले ड्रोन; आ. एकनाथ खडसें यांचा दावा !

0
5

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर परिसरात संशयास्पद ड्रोनच्या हालचालींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. खडसे यांच्या निवासस्थानी ड्रोन फिरत असल्याचे त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केले होते. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली असल्याची माहिती आहे.

दरम्यान, घोडसगाव येथील काही नागरिकांनी मलकापूरकडून मुक्ताईनगरच्या दिशेने आकाशात संशयास्पद ड्रोनसदृश वस्तू पाहिल्याचा दावा केला आहे. ही वस्तू नेहमीच्या ड्रोनपेक्षा आकाराने मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे हे नेमके ड्रोन आहे की अन्य कोणते उपकरण, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुक्ताईनगर शहर परिसरातही दररोज ड्रोनसदृश वस्तू फिरताना आणि परिसराची पाहणी करत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या हालचाली नेमक्या कोणाच्या आहेत आणि त्यामागील उद्देश काय, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना माहिती दिली की, काल त्यांच्या फार्महाऊस परिसरातही ड्रोनद्वारे रेकी केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या सर्व प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संशयास्पद ड्रोन किंवा उपकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे. हे उपकरण कुठून आले, ते कोण चालवत आहे, त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जात आहे आणि त्यामागे नेमके कोण आहे, याचा तपास करून आवश्यक ती कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पोलिस व प्रशासनाकडून तांत्रिक तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. संशयास्पद ड्रोनच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अधिकृत माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound