Home धर्म-समाज जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; भगवान बिरसा...

जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन!

0
1

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विकासासाठी विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय योजनांचा लाभ थेट आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासह आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगार मार्गदर्शन आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या सप्ताहाची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी १२ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी १.३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, आदिवासी विभागाचे अधिकारी चव्हाण, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शिवसेना पदाधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमीनच्या संरक्षणासाठी आणि ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात आठवडाभर विविध विभागांच्या समन्वयातून हा सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. ११ आणि १२ नोव्हेंबर रोजी जिल्हा मुख्यालयासह आदिवासीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषद आणि जनजागृतीच्या माध्यमातून सप्ताहाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. आदिवासी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, हा यामागील उद्देश आहे.

१३ नोव्हेंबर रोजी आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात येणार असून नवीन अर्जांचे संकलनही केले जाणार आहे. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA), पीएम-जनमन (PM-JANMAN) आणि महिला बचत गटांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत. कृषीपूरक व्यवसाय, सिंचन सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सायंकाळी या स्मारकांच्या ठिकाणी दीपोत्सवाचे आयोजन केले जाईल. यासोबतच आदिवासी लोकसंस्कृती, देव-देवता, पारंपरिक रूढी आणि परंपरांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.

१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती जिल्हा आणि तालुकास्तरावर उत्साहात साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्यासह स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरविण्यात आलेले आदिवासी समूह, समाजसेवक, बुद्धिजीवी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा जिल्हास्तरावर विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच चौक, रस्ते आणि उद्यानांना आदिवासी महापुरुषांची नावे देण्यासंदर्भातील प्रस्तावही हाती घेण्यात येणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी नागरिकांसाठी नागरी सेवा आणि शासकीय कागदपत्रांसंदर्भात विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ओळखपत्रे तसेच विविध शासकीय कागदपत्रांमधील दुरुस्ती आणि अद्ययावतीकरणासाठी मदत केली जाणार आहे. वनपट्टेधारकांना योजनांचे लाभ वितरित करणे, कृषी योजनांची ऑनलाइन नोंदणी, पीकविमा आणि विविध ई-सेवांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

१७ नोव्हेंबर रोजी आरोग्य आणि पोषण जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने भव्य आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये सिकलसेल आजाराविषयी जनजागृती आणि तपासणी, रक्तदाब व मधुमेह चाचणी, माता-बाल संगोपन तसेच स्थानिक पौष्टिक तृणधान्ये आणि परसबाग याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी युवक-युवतींच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. रोजगार मेळावे, आयटीआय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण, शिष्यवृत्तीविषयक मार्गदर्शन, बँक खाते उघडण्यासाठी मदत तसेच डिजिटल आर्थिक साक्षरतेसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांसह जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा समारोप होणार आहे.

या संपूर्ण सप्ताहात शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणे, हे या सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधव, शेतकरी, युवक-युवती, महिला भगिनी आणि नागरिकांनी या सेवा सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शासकीय योजनांचा आणि लोककल्याणकारी उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील आणि आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound