यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जनजातीय गौरव सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांना प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरात जनजातीय गौरव सप्ताह साजरा केला जातो. आदिवासी समाजाचे योगदान, संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा गौरवशाली इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

याच पार्श्वभूमीवर यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत आदिवासी महिलांच्या बचत गटांना धनादेश वितरित करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यात आले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना धनादेश प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रवीण दाभाळे आणि विकास पाटील उपस्थित होते.



