Home Cities जळगाव दुष्काळी परिस्थितीत करवाढीचा बोजा नको! नशिराबाद जनहित समिती आक्रमक

दुष्काळी परिस्थितीत करवाढीचा बोजा नको! नशिराबाद जनहित समिती आक्रमक

0
1

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद शहरातील नागरिक आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असताना नगरपरिषदेने मालमत्ता करात केलेली वाढ अन्यायकारक असल्याचा आरोप नशिराबाद जनहित समितीने केला आहे. ही करवाढ तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणेच मालमत्ता कर आकारण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) समितीच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी हे निवेदन स्वीकारले.

नगरपरिषदेने केलेल्या पंचवार्षिक फेरमूल्यांकनामुळे मालमत्ता करात वाढ झाली असून, या निर्णयाचा आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांवर पडत असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकणे योग्य नसल्याची भूमिका समितीने मांडली. त्यामुळे पंचवार्षिक वाढीव फेरमूल्यांकनाचा निर्णय रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे वाढीव मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करून पूर्वीप्रमाणे कर आकारणी करावी, तसेच वाढीव कर वसुलीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय फेरमूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या संभाव्य त्रुटींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, असेही समितीने स्पष्ट केले आहे. मालमत्ता कराच्या फेरमूल्यांकनामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विशेष सवलत देऊन त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या संपूर्ण विषयावर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा करून करवाढ रद्द करण्याबाबत अधिकृत ठराव मंजूर करावा, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश चव्हाण, बरकत अली, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, बंडू रत्नपारखे आणि उल्हास चौधरी यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नगरपरिषदेने करवाढीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही नशिराबाद जनहित समितीने दिला आहे.


Protected Content

Play sound