Home प्रशासन नगरपालिका बोदवडच्या सरस्वती नगरमध्ये २५ दिवसांपासून नळ कोरडे ! पाण्यासाठी नागरिकांची वणवण 

बोदवडच्या सरस्वती नगरमध्ये २५ दिवसांपासून नळ कोरडे ! पाण्यासाठी नागरिकांची वणवण 

0
1

बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील सरस्वती नगर परिसरात गेल्या तब्बल २५ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना वणवण करावी लागत असताना नगरपंचायत प्रशासन नेमके काय करत आहे? ठेकेदाराच्या कामकाजावर प्रशासनाचा वचक आहे की नाही? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

सरस्वती नगरमधील पाणीटंचाईचा प्रश्न एका सामान्य मतदाराने सोशल मीडियावरील ‘बोदवड शहर विकास आघाडी’ या ग्रुपवर संदेश टाकून मांडला आहे. गेल्या २५ दिवसांपासून परिसरातील नळांना पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची व्यथा या संदेशातून व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रश्नाला केवळ पाणीपुरवठ्यापुरते मर्यादित न ठेवता संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

संबंधित संदेशात ठेकेदार आमदार साहेबांचेही ऐकत नसेल आणि स्वतःच्या मनमानी पद्धतीने काम करत असेल, तर नगरपंचायत प्रशासनाचा त्याच्यावर वचक का नाही? असा थेट सवाल करण्यात आला आहे. सरकारमध्ये असतानाही एका ठेकेदारावर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्यांसाठी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त प्रश्नही मतदाराने उपस्थित केला आहे. येत्या निवडणुकीत नागरिकांनी कोणत्या मुद्द्यांवर मतदान करावे, याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावे, अशी अपेक्षाही या संदेशातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सरस्वती नगरमधील पाणीप्रश्न आता केवळ नागरी सुविधेचा विषय न राहता लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारा मुद्दा ठरत आहे.

दरम्यान, गेल्या २५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असण्यामागचे नेमके कारण काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे की ठेकेदाराच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांना पाणी मिळत नाही? नगरपंचायत प्रशासनाने याबाबत आतापर्यंत कोणती कार्यवाही केली? तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे? याबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणे ही नगरपंचायतीची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे सरस्वती नगरमधील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, २५ दिवस पाणीपुरवठा का झाला नाही याची कारणे स्पष्ट करावीत आणि संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound