चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दीपावलीच्या मंगलमय पर्वावर उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चोपडा येथे भावपूर्ण ‘दीपवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाळकी (ता. चोपडा) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अजितदादांचे खंदे समर्थक सुनील पाटील यांच्या संकल्पनेतून गुरुवारी सायंकाळी नगरपरिषदेच्या उद्यानात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी पणत्या प्रज्वलित करून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
‘आठवणींचा दीप तसाच तेवत राहील, स्वर्गीय अजितदादांच्या विचारांचा प्रकाश सदैव मार्ग दाखवत राहील,’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पणत्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. प्रत्येक पणतीतून अजितदादांविषयीचा जिव्हाळा, प्रेम आणि आदर व्यक्त होत होता. त्यांच्या सहवासातील आठवणी, प्रेमळ बोलणे, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी आणि जनतेशी जोडलेले नाते यांना यावेळी उजाळा देण्यात आला.

स्वर्गीय अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि प्रेमाचा वारसा प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहील. चोपडेकरांनी प्रज्वलित केलेल्या हजारो पणत्या म्हणजे दादांवरील अढळ प्रेमाची आणि अतूट नात्याची साक्ष आहे. जनतेसाठी झटण्याची त्यांची तळमळ, कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी आपल्या कार्यातून असंख्य माणसांच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लावलेला प्रत्येक दिवा त्यांच्या आठवणी, विचार आणि कार्याचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन सुनील पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोसाकाचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, माजी चेअरमन अॅड. घनश्याम पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, जिल्हा बँकेच्या माजी व्हाईस चेअरमन इंदिराताई पाटील, बाजार समितीचे माजी सभापती कांतीलाल पाटील, माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, सूतगिरणी संचालक शशिकांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनिल वानखेडे, नगरसेवक नरेंद्र पाटील, रोहन पाटील, रानूदादा बागवान, माजी नगरसेवक राजाराम पाटील, शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब पाटील, राजू बिटवा, अॅड. धर्मेंद्र सोनार, संतोष अहिरे, पत्रकार मिलिंद सोनवणे, सुनील जैन, नेमीचंद जैन आणि रविंद्र अलिझाड यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती होती.



