पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविलेला त्यांचा उमेदवारी अर्ज नाशिक येथील सहआयुक्तांकडील सुनावणीनंतर अखेर वैध ठरविण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, १३ नोव्हेंबर रोजी पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
जळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अपुऱ्या माहितीच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

आपला उमेदवारी अर्ज कुठल्यातरी अदृश्य शक्तीच्या दबावाखाली अवैध ठरविण्यात आल्याचा आरोप सुमित पाटील यांनी केला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी नाशिक येथील सहआयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर सहआयुक्तांनी सुमित किशोर पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाची माहिती मिळताच पाचोऱ्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. १३ नोव्हेंबर रोजी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
या जल्लोषप्रसंगी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, नगरसेवक प्रविण ब्राह्मणे, गंगाराम पाटील, रहेमान तडवी, किशोर पाटील, अशोक पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सुमित पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुमित किशोर पाटील यांच्यावतीने या प्रकरणाचे कायदेशीर कामकाज अॅड. विक्रम पवार आणि अॅड. प्रमोद पाटील यांनी पाहिले. उमेदवारी अर्ज वैध ठरविण्याच्या निर्णयामुळे समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबतही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.



