जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगतच्या आसोदा शिवारातील हातेड नाल्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३८ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गलू देविदास कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, विशेष म्हणजे मृतदेहाजवळच त्यांची दुचाकीही आढळून आली आहे. तरुणाचा मृत्यू अपघातात झाला की यामागे घातपात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गलू देविदास कोळी हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू असतानाच आसोदा शिवारातील हातेड नाल्यात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह गलू कोळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. अनेक दिवसांपासून मृतदेह पाण्यात किंवा नाल्यात पडून असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. मृतदेहाजवळच दुचाकी आढळून आल्याने या घटनेचे गूढ अधिक वाढले आहे.

दरम्यान, गलू कोळी यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. गलू कोळी यांचा मृत्यू दुचाकीवरील अपघातामुळे नाल्यात पडल्याने झाला की या घटनेमागे काही वेगळे कारण अथवा घातपात आहे, याबाबत सध्या तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरणार आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जळगाव तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



