Home Cities जळगाव रस्त्यावर प्रसूती प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी; सीईओंनी दिले कडक निर्देश

रस्त्यावर प्रसूती प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी; सीईओंनी दिले कडक निर्देश

0
164


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कर्जाने आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात एका आदिवासी महिलेला भर रस्त्यात प्रसूती करावी लागल्याच्या गंभीर घटनेनंतर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी ३० मे रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीदरम्यान प्रमुख आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर बोलताना मीनल करनवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामीण आणि आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा पोहोचवणे ही आरोग्य विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही.

सीईओ मिनल करनवाल यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्देश दिले. त्यात प्रामुख्याने:
आदिवासी भागांसाठी कृती आराखडा तयार करणे: विशेषतः गर्भवती व बाळंत महिलांसाठी प्रभावी आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
औषध वाटप योजना मजबूत करणे: आवश्यक औषधे वेळेवर व नियमितपणे वितरीत होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. रुग्णवाहिकेची सेवा सुधारण्यावर भर: प्रत्येक रुग्णवाहिकेत जीपीएस ट्रॅकर बसवण्याचे आदेश दिले, जेणेकरून तिचे मूव्हमेंट ट्रॅक करता येईल व आपत्कालीन प्रसंगी वेळेवर पोहोचता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांना जबाबदारीने वागण्याचा आग्रह: सेवाभाव, तत्परता व शिस्तबद्धता ही आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख ठरली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह अनेक वरिष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी एकजुटीने आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी एकमताने दिले.

या बैठकीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील आरोग्य सेवा ही प्राथमिकता असून, कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नाही असे निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिले आहे.


Protected Content

Play sound