नवी दिल्ली वृत्तसंस्था । अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छपाक’ चित्रपटाच्या निर्मात्यांना आज दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे. ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या वकीलाला चित्रपटात श्रेय देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने निर्मात्यांना दिले आहेत. पीडितेच्या वकीलांना श्रेय दिले नाही. तर १५ जानेवारीनंतर हा चित्रपट दाखवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
ॲसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने सिनेमात क्रेडिट न दिल्यामुळे सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. ॲसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असे असतानाही सिनेमात तिला क्रेडिट देण्यात आले नाही, असे वकील अपर्णा भट्ट यांचे म्हणणे होते. या प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी झाली असून न्यायमूर्ती प्रतीभा एम.सिंग यांनी यासंदर्भात निकाल दिला. त्या म्हणाल्या, वकीलाच्या नावाचा समावेश करून चित्रपटाच्या क्रेडीट लिस्टमध्ये १५ जानेवारीपर्यंत बदल करण्याचे आदेश, हायकोर्टाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम.सिंग.यांनी दिले. लाइव्ह स्ट्रिमिंगसह इतर ठिकाणी क्रेडीट लिस्टमध्ये बदल करण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत निर्मात्यांना मुदत दिली आहे. निर्मात्यांनी हे बदल न केल्यास १५ जानेवारीनंतर चित्रपटाचे प्रदर्शन रोखले जाईल, असे हायकोर्टाने बजावले आहे.