


मुंबई-वृत्तसेवा । गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेन्स लागून असलेले ऑपरेशन टायगर निश्चीत झाले असून शिवसेना-उबाठा पक्षाचे नऊपैकी सहा खासदार फुटले असून ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलीकडेच तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडून आमदार आणि खासदारांनी स्वतंत्र गट तयार केल्यानंतर महाराष्ट्रात देखील बहुप्रतिक्षीत ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण होणार असल्याची चाहूल लागली होती. या पार्श्वभूमिवर, दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या खासदारांची बैठक घेतली होती. यात नऊपैकी पाच जण ऑनलाईन उपस्थित असल्याचे संजय राऊत यांनी सांगितल्यानंतर सर्वांनाच या पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. आणि यानंतरच्या घडामोडी तशाच घडल्या.
काल दुपारपासूनच शिवसेना-उबाठा पक्षातील सहा खासदार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आज सकाळी पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षात फुट पडत असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले. यात राऊत यांनी आपण पक्षाच्या वतीने खासदारांना व्हीप जारी केला असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी संबंधीत खासदारांनी शपथा मोडल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.
याप्रसंगी संजय राऊत म्हणाले की, आमच्या सहा खासदारांना प्रत्येकी पंधरा कोटी रूपये देण्यात आले असून यानंतरच ते दिल्लीत दाखल झाले आहेत. अशा प्रकारे आमीष दाखवून पक्षात फुट पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सूत्रांच्या माहितीनुसार, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्तर-पूर्व मुंबईचे मुंबईचे संजय दिना पाटील हे खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे आता संकेत मिळाले आहेत.
तर दुसरीकडे, शिवसेना-उबाठा पक्षाच्या नऊपैकी फक्त अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदारच पक्षासोबत राहणार असल्याचे आता सिध्द झाले आहे. तर फुटीर खासदार आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना भेटणार असून त्यांना आपला नवीन निर्णय कळविणार असल्याचे समजते. तर शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने उद्या म्हणजेच १८ जून रोजी दिल्लीत बैठक घेण्यात येणार असून याला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संबोधीत करणार असल्याची माहिती देखील खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी दिली. तर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल पाहिजे तसा हवा असेल तर आमच्या सोबत या असा निरोप देण्यात आल्याचा धक्कादायक आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी केला.



