


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील ज्वारी खरेदी केंद्रावरील ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, बोदवड येथील ज्वारी खरेदी केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑनलाइन नोंदणी तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, अर्ज स्वीकारल्यानंतर नोंदणी क्रमांक आणि रजिस्टरमधील नोंदी योग्य पद्धतीने करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काही शेतकऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्राधान्य देण्यात आले असून, इतर पात्र शेतकऱ्यांना मागील क्रमांकावर टाकण्यात आल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे ज्वारी खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे.
डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ऑनलाइन नोंदणी क्रमांकाच्या आधारे कोणताही भेदभाव न करता नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने ज्वारी खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित केंद्रावरील नोंदी व प्रक्रियेची पडताळणी करावी, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.



