नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना जारी: पालकमंत्र्यांनी पाळला शब्द

मुंबई (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून आज याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तर, जळगावच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिना अखेर पर्यंत नगरपरिषद अस्तित्वात येणार असल्याचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द हा खरा ठरला असून येथे आता अन्य नगरपालिकांसोबत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नशिराबाद हे जळगाव तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून ते कधी काळी खूप मोठी बाजारपेठ होती. ब्रिटीश काळात नशिराबादला जळगावपेक्षा जास्त महत्व होते. काळाच्या ओघात जळगाव प्रगतीत खूप पुढे निघून गेले तरी नशिराबाद हे खूप मोठे व महत्वाचे शहर मानले जाते. येथे आजवर १७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत कार्यरत होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात येथे नगरपरिषदेच्या निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. कोविडमुळे यात काही महिने विलंब झाला. मात्र गत वर्षाच्या अखेरीस नगरपरिषदेची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, ग्रामपंचायतीची निवडणूक आली. लवकरच नगरपरिषद होणार असल्याने गावकर्‍यांनी अभूतपुर्व एकी दाखवत या निवडणुकीत भागच घेतला नाही. येथे फक्त एक सदस्य अविरोध निवडून आल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात नशिराबाद नगरपरिषदेसाठीची तयारी जोराने सुरू होती. यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद याच्यातर्फे स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नगरपरिषदेसाठी स्थानिक नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात एकानेच घेतलेल्या आक्षेपालाही प्रशासनाने समाधानकारक निराकरण केले. यातच काही दिवसांपूर्वी पाकलमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जून महिन्याच्या अखेरीस नगरपरिषद होणार असल्याचे सूतोवाच केले होते. या अनुषंगाने आज नशिराबाद नगरपरिषदेची अधिसूचना निघाली आहे. तर निवडणूक होईपर्यंत जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी नशिराबदकरांना नगरपरिषदेचा दिलेला शब्द पाळला आहे. या शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत. आगामी निवडणुकीत शहरवासी आम्हाला कौल देतील हा पूर्ण विश्‍वास आहे. आजचा दिवस हा नशिराबादच्या इतिहासातील सोन्याचा दिवस असून आम्ही याचे मन:पूर्वक स्वागत करत आहोत. नगरपरिषद झाल्यामुळे नगरविकास खात्याच्या रस्ते व पायाभूत सुविधांच्या सर्व योजना या शहरासाठी मंजूर करण्यात येणार आहेत. यामुळे नशिराबादला नवीन वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही ना. पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

Protected Content