पंधरा दिवसांत देणार एस.जे. शुगर कंपनी शेतकऱ्यांचे उर्वरित देयक !

चाळीसगाव प्रतिनिधी ।  रावळगाव येथील एस.जे.शुगर कंपनी हळूहळू थकबाकी जमा करीत असताना, कंपनीने उर्वरित देयके स्पष्ट केली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. नुकताच मंगेश चव्हाण यांनी कंपनीच्या संचालकांना निवेदन दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत थकबाकी अदा केली जाईल, अशी लेखी हमी कंपनीने दिली आहे. 

शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तीव्र भूमिका घेतल्यानंतर नरमलेल्या रावळगाव येथील एस.जे.शुगर कंपनीने गेल्या आठवड्यात प्रति टन उसामागे १००० रुपये शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली. मात्र उर्वरित देयकांबाबत कारखान्याने अजून भूमिका स्पष्ट केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी एस.जे.शुगरच्या संचालिका मीरा घाडीगावकर यांची दि.२९ जून रोजी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी कंपनी संचालिका घाडीगावकर यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति टन १ हजार रुपये याप्रमाणे देयके जमा झाली आहेत तर उर्वरित शेतकऱ्यांना चेक स्वरुपात देयके दिली जात आहेत. सदर चेक देताना पैश्यांच्या मागणीचे गैरप्रकार होत असून शेतकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये याची काळजी कंपनीने घ्यावी. कंपनीने जरी आत्ता थोडीफार रक्कम शेतकऱ्यांना दिली असली तरी शेतकरी त्यावर समाधानी नाहीत. आधीच देयके देण्यास खूप उशीर झाला आहे, त्यामुळे एफआरपी प्रमाणे प्रति टन २३०० रुपये व त्यावरील व्याज अशी शेतकऱ्यांची उर्वरित देयके कधीपर्यंत देण्यात येतील याबाबत येत्या २ दिवसात आम्हाला लेखी कळवावे. 

अन्यथा दोन दिवसानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा इशारा दिला असता आज दि.३० जून रोजी एस.जे.शुगर कंपनीचे पत्र आमदार मंगेश चव्हाण यांना प्राप्त झाले असून येत्या १५ दिवसात उर्वरित शेतकऱ्यांचे सर्व थकीत देयके अदा करण्यात येतील अशी लेखी हमी कंपनीने दिली आहे. त्यामुळे येत्या १ जुलै ते ५ जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती कंपनीने केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून केवळ आंदोलन, इशारा, घोषणा न करता हातात घेतलेल्या प्रश्नाचा पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावण्याच्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीचे शेतकऱ्यांमध्ये कौतुक होत आहे.

 

 

Protected Content