मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेचे सभापती राहूल नार्वेकर यांनी शिवसेनेतील सदस्यांना अपात्रतेची नोटीस बजावली असून यामुळे या प्रकरणावर लवकरच निर्णय लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या आमदारांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १४ आमदारांना ही नोटीस जारी केली आहे. यावर आता ते लवकरच निर्णय घेण्याची शक्यता बळावली आहे.
गेल्या वर्षीच्या जून महिन्यात शिवसेनात पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी याबाबत कायदेशीर लढाई सुरू केली. यात सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करुन यावर निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने ही प्रत त्यांना पाठवली आहे. या पार्श्वभूमिवर आता सदर प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.