मुक्ताईनगर नगरपालिका बरखास्त करण्याची काँग्रेसची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरात कोणत्याही प्रकारची विकासकामे होत नसून सत्ताधारी हतबल झाल्याचा आरोप करत मुक्ताईनगर नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

येथील विश्रामगृहावर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली. याप्रसंगी पदाधिकारी म्हणाले की, कृषी कायदा हा शेतकरी हिताचा नसताना खासदार रक्षा खडसे या कायद्याचा कायद्याचे समर्थन करत आहेत. जर कायदा फायद्याचा असेल तर त्यांनी शेतकर्‍यांसमोर त्याचे फायदे सांगावेत. खासदार खडसे या केळी पट्ट्यातील असतानाही केळी व कपाशी उत्पादक शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी त्यांना अनुदान मिळवता आले नाही. सत्ताधारी गटाचे ९ पदाधिकारी उपोषण केल्याने नगरपालिकेने विश्‍वास गमावला असून पदाधिकार्‍यांनी राजीनामा द्यावा. आणि नगरपालिका बरखास्त करून प्रशासक बसवण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पोलिस महासंचालकाकडे तालुक्यातील अवैध धंद्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र गेली ३० वर्षे तालुक्यावर एक हाती सत्ता कुणाची होती? त्यातूनच शहर व तालुक्यात अवैध धंदे वाढीस लागले हे सांगण्याची गरज नसल्याचा टोला देखील या पत्रकार परिषदेत मारण्यात आला.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, सचिव आसिफ खान इस्माईल खान, संजय पाटील, शहराध्यक्ष पवन खुरपडे,अ‍ॅड. कुणाल गवई यावेळी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.