ओबीसी आरक्षणावर सुनावणी नाहीच : निवडणुका पावसाळ्यानंतरच होणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकेची आजदेखील सुनावणी न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पावसाळ्यानंतरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा. पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबीत असून सर्वत्र प्रशासक राज सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी आज होणार असणे अपेक्षित होते. मात्र यावरील सुनावणी आज देखील झाली नाही. आता तीन आठवड्यानंतर यावर सुनावणी होणार आहे. म्हणजेच याबाबतचा निर्णय मे महिन्यात होणार असल्याने निवडणुका पावसाळ्याच्या नंतरच होतील हे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयात नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील याचिका आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर सुनावणीस निघाली असता सॅालिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या सर्व प्रकरणांमध्ये यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार पत्र दिल्याचे सांगितले. त्यांच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची सुनावणी आता तीन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. यामुळे निवडणुका पुढे जाणार असून इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

Protected Content