हैदराबाद वृत्तसंस्था । पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीत फक्त एकच जागा शिल्लक असल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यामुळे आता कोणाची निवड होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी संघात स्थान मिळवण्याचे जवळजवळ निश्चित असल्याचे कोहलीच्या या वक्तव्यावरून सूचित होत आहे. ही स्पर्धा एका जागेसाठी आहे आणि मला वाटते की तिन्ही खेळाडूंनी त्यांची जागा जवळपास पक्की केली आहे. ही निकोप स्पर्धा आहे. वेगवान गोलंदाजी विभागात असलेल्या अनेक पर्यायांबाबात बोलताना कोहली म्हणाला की, कर्णधार म्हणून माझ्यासाठी ते चांगले आहे. संघात अनेक जलदगती गोलंदाज असणे हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे असे नाही. मला वाटते भुवी (भुवनेश्वर) आणि जसप्रीत बुमराह हे अनुभवी खेळाडू आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीत बरीच सुसंगतता आहे. दीपक (चाहर) देखील चांगली गोलंदाजी करत आहे.’