


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांच्या अटकेवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साधलेल्या चुप्पीबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी एक मोठा दावा केला आहे.
काल ईडीने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेच्या सोबतच कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याचा निषेध करत भाजपवर हल्लाबोल केला असतांना शरद पवार यांनी मात्र चुप्पी साधली आहे. त्यांनी या प्रकरणी नेमके भाष्य का केले नाही ? याबाबत चर्चा सुरू असतांनाच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना याबाबत भाष्य केले आहे.
या संदर्भात आमदार शिरसाठ म्हणाले की, शिवसेना फुटल्यामुळे आता संजय राऊत यांची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे आता शरद पवार त्यांच्या अटकेनंतर त्यांच्याविषयी साधी प्रतिक्रियाही द्यायला तयार नाहीत. संजय राऊत यांना आता त्यांची लायकी कळेल. ज्यांच्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेना नेस्तनाबूत केली, शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, त्या कर्माची फळं आता संजय राऊत हे भोगत आहेत. शरद पवारांच्या स्वत:च्या पक्षाचे दोन नेते तुरुंगात आहेत. त्यावर शरद पवार कधी बोलत नाहीत. मग संजय राऊतांवर बोलायला ते कोण लागून गेले, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.



